Header Ads

Hindu's New Year Gudi Padwa: A Golden Festival, हिंदू नववर्ष गुढी पाडवा : एक स्वर्णपर्व

Festivals

हिंदू नववर्ष गुढी पाडवा : एक स्वर्णपर्व

 Hindu's New Year Gudi Padwa :A Golden Festival

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारणी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा.

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

  गुढीपाडवा हा एक भारतीय सण (Festival) असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. शास्त्रात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा शुभारंभ होतो

Festival
  

सांस्कृतिक इतिहास

    ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे.

 श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.

शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला.

प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरु केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया यादिवशी ती सासरी जाते.

ध्वजांचे पौराणिक उल्लेख

श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव (Festival) साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे.

  ततोऽभयवकिरंस तव अन्ये लाजैः पुष्पैश च सर्वतः

    समुच्छ्रितपताकास्तु रथ्याः पुरवरोत्तमे ||

     ततो हय अभ्युच्छ्रयन पौराः पताकास्ते गृहे गृहे

    ऐक्ष्वाकाध्युषितं रम्यम् आससाद् पितुर्गृहम् ||

 

हे वाल्मिकी रामायणातील श्लोक आहेत. ह्यांत गुढी असे कुठेही म्हटले नसून पताका हाच शब्द वापरलेला आहे

महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात.महाभारतातच खिलपर्वात कृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव (Festival) वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे

या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात. तसेच रांगोळी काढली जाते.

गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोड जेवणाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते.

 

Festival

 गुढीपाडव्याच्या गुढीचे स्वरूप

चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.

गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते. काठी स्वच्छ धुवून, त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर (सहसा तांब्या-पितळ्याच्या नाहीतर चांदीचे/कास्याचा) धातूचे भांडे/तांब्या/गडू/फुलपात्र बसवले जाते. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढतात. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. तयार केलेली गुढी दारात/उंच गच्चीवर/गॅलरीत लावतात. गुढीची काठी तिथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात. निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दूध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हा हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभिष्टचिंतनही केले जाते.

पूजा पद्धती

स्नान इ.दैनंदिन कर्मे झाल्यावर गुढी उभारली जाते. वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करतात. गुरू, वडीलधाऱ्यांना वंदन करावे, अशीही रूढी आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे,असा संकेत रूढ आहे. संवत्सर फल म्हणजे काय? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते, त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे जर मंगळवारी सुरू होत असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली. तिला पहिले पद मिळाल्याने ती प्रतिपदाम्हणून ओळखली जाते असे मानले जाते. या तिथीला युगादीतिथी असेही म्हणतात.

     या दिवशी उपाध्यायाकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात. या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे.:-

 "तिथेश्च श्रीकरं प्रोक्तं वारादायुष्यावर्धनम् |

नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् ||

करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चाङ्गफ़लमुत्तमम् |

एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानंफलं लभेत्||"

अर्थ - तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते.वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो. योगश्रवणाने रोग जातो. करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तमफल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते.

चैत्र हा अधिकमास असता, काहींच्या मते अधिकमासाच्या शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभाची धार्मिक कृत्ये करावीत; तर काहींच्या मते ती शुद्ध किंवा निज चैत्राच्या प्रतिपदेस करावी, असा मतभेद आहे. याविषयी धर्मसिंधूने निर्णय दिला आहे तो असा- अभ्यंगस्नानादी कृत्ये अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेसच करावी; पण गुढी उभारणे, कडुलिंबाची पाने खाणे, पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेस कराव्या.

मध्ययुगात हा उत्सव (Festival)  राजा अथवा त्याच्या अधिकाऱ्याकडून साजरा केला जात असे. सात गावांचा अधिपती असलेली व्यक्तीही हा उत्सव संपन्न करीत असे. आता घरोघरी हा उत्सव साजरा होतो.

 

Festival

आरोग्यदृष्ट्या महत्त्व

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते. शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.


गुढी प्रेमाची उभारूया मनी,
औचित्य शुभमूहूर्ताचे करुनि,
विसरून जाऊ दुःख राग सारे,
स्वागत कार्य नववर्षाचे प्रेमभरे...!!
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

No comments

Please do not enter any spam link in the comment box.

Powered by Blogger.