Header Ads

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी व्रत कथा ( मराठी )

Ekadashi
Mohini Ekadashi-2024

 !! मोहिनी एकादशी व्रत कथा !!


    अर्जुनाने संयम आणि श्रद्धापूर्वक कथा ऐकल्यावर श्रीकृष्णास म्हटले -हे मधुसूदन ! वैशाख महिन्यात, शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे ? तसेच उपवास करण्याचे विधिविधान काय आहे ? कृपा करून मला हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी.

    श्रीकृष्ण म्हणाले - हे अर्जुन ! मी एक पौराणिक कथा सांगतो आहे. ज्या कथेला महर्षी वशिष्ठांनी श्रीरामचंद्रांना सांगितली होती. ती मी तुला सांगतो, लक्ष देऊन श्रवण कर. त्या काळातील गोष्ट आहे, श्रीरामजीनी महर्षी वशिष्ठांना विचारले - हे गुरुश्रेष्ठ ! मी जनकनंदिनी सीताजींच्या वियोगात खूप कष्ट सोसले आहेत. अंततः माझे हे सर्व कष्ट कसे नाश पावतील ? आपण मला असे कोणतेहि व्रत सांगण्याची कृपा करावी जेणे करून माझे सर्व कष्ट आणि पाप नष्ट होतील.

    महर्षी वशिष्ठ म्हणाले - हे श्रीराम ! आपण खूप चांगला प्रश्न विचारला आहे. आपली बुध्दि अत्यंत कुशाग्र आणि पवित्र आहे. आपले नाम मात्र स्मरण केल्याने मनुष्य पवित्र होतो. आपण लोकहिता करिता सर्वात उत्तम प्रश्न केला आहे. मी आपल्याला एक एकादशी व्रताचे माहात्म्य सांगतो आहे. वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशी जिचे नाव मोहिनी एकादशी आहे. या एकादशीचा उपवास केल्याने मनुष्याचे सर्व पापें आणि क्लेश नष्ट होतात. या उपवासाच्या प्रभावाने मनुष्य मोहजालातून मुक्त होतो. अंततः हे राम ! दुःखी मनुष्यास या एकादशीचा उपवास अवश्य करायला पाहिजे. हे व्रत केल्याने मनुष्याचे सर्व पापें नष्ट होतात.

    आता आपण हि कथा श्रध्दापूर्वक श्रवण करावी. प्राचीन समयी सरस्वती नदीकिनारी भद्रावती नामक एक नगर होते. त्या नगरात द्यूलीमान नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच नगरात एक वैश्य राहत होता. जो धन-धान्याने संपन्न होता. त्याचे नाव धनपाल होते. तो खूप धार्मिक तसेच नारायण भक्त होता. त्याने नगरात भरपूर भोजनालये, पाणपोई, विहिरी, तलाव, धर्मशाळा इत्यादी केल्या होत्या. नगरात रस्त्याच्या बाजुला आंबा, जांभूळ , कडुनिंब इत्यादी यांचे वृक्षारोपण सुध्दा केले होते. ज्यामुळे प्रवाशांना प्रवास करतांना सुख प्राप्त होईल. त्या वैश्याला पांच पुत्र होते. सर्वात मोठा पुत्र अत्यंत पापी आणि दृष्ट होता. त्याचे आचरण चांगले नव्हते . तो वेश्यागमन तसेच वाईट संगतीत राहत असे. जो काही वेळ मिळत असे तो वेळ जुगार खेळण्यात घालवत असे. हे सर्व अधर्म कार्य करीत असे. तो नास्तिक म्हणजेच देवता, वाड-वडीलधारी माणसे इत्यादी काहीच मानत नव्हता. आपल्या वडिलांचे धन, पैसा तो सर्व वाईट व्यसनांसाठी खर्च करत असे. मद्यपान आणि मांस भक्षण करणे हे तर त्याचे नित्यक्रमच होते. त्याच्या वडिलांनी तसेच भावांनी त्याला खूप समजावयाचा प्रयन्त केला पण सरते शेवटी त्याला सर्वानी घरातून बाहेर काढले. तसेच त्याची निंदा केली. घरातून बाहेर पडल्यावर त्याने आपले वस्त्र आणि आभूषण ( दागिने) विकून त्याचा उदरनिर्वाह केला.

      जो पर्यंत त्याच्याकडे पैसा होता तो पर्यंत सर्व म्हणजेच वेश्या, दृष्ट मित्र त्याच्या सोबत होते. त्या नंतर सर्वांनी त्याला सोडून दिले. त्यानंतर जेव्हा तो तहान-भुक ने व्याकुळ झाला तेव्हा त्याने चोरी करण्याचा विचार केला आणि रात्र समयी चोरी करून निर्वाह करू लागला. परंतु एक दिवस तो पकडला गेला. पण वैश्याचा पुत्र समजून शिपायांनी त्याला सोडून दिला. जेव्हा परत दुसऱ्या वेळी पुन्हा पकडला गेला तेव्हा शिपायांनी त्याला सोडून न देता राजाच्या समोर सादर केले आणि सर्व वृतांत राजास सांगितला. राजाने त्याला कारागृहात टाकले. राजाच्या आदेशानुसार त्याला कडक शिक्षा करण्यात आली. शेवटची त्याला त्या नगरातून बहिष्कृत करण्यात आले. दुःखी होऊन त्याला नगर सोडावे लागले.

    आता तो जंगलामध्ये पशु आणि पक्षांना मारून पोट भरत असे. नंतर तो फासेपारधी बनून धनुष्य-बाणाने निष्पाप जीवांना मारून उदरनिर्वाह करू लागला. एकदा तो भूक आणि तहान याने व्याकुळ होऊन भोजनाच्या शोधात निघाला आणि योगायोगाने कौंटीन्य ऋषींच्या आश्रमात जाऊन पोहचला.

    त्यादिवसांमध्ये वैशाख महिना होता. कौंटीन्य ऋषी गंगा स्नान करून आले होते. त्यांच्या ओल्या वस्त्रावरील काही पाण्याचे थेंब याच्या अंगावर उडाले. फक्त त्या पाण्याच्या थेंबांमुळे त्या पापीला काही सुबुध्दी प्राप्त झाली. तो अधर्मी, ऋषी जवळ जाऊन हात जोडून म्हणाला- हे महात्मा ! मी आपल्या जीवनात अनेक अक्षम्य पापें केली आहेत. कृपा करून आपण त्या पापांपासून मुक्ती मिळण्याकरिता कोणताही साधा सरळ आणि विना खर्चिक उपाय सांगावा.      

    ऋषी म्हणाले - तू हे लक्ष देऊन श्रवण कर. वैशाख महिन्यात, शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत कर. या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. या एकादशीच्या उपवासाने तुझे सर्व पापें नष्ट होतील.

    ऋषींचे हे बोलणे ऐकून तो खूप प्रसन्न झाला आणि त्यांनी जसे सांगितले त्याप्रमाणे सर्व विधिविधानपूर्वक, श्रध्देने आणि भक्तिभावाने मोहिनी एकादशीचे व्रत केले.

    हे श्रीराम ! या एकादशीच्या व्रताच्या प्रभावामुळे त्याचे सर्व पापें नष्ट झालीत आणि अंततः तो गरुडावर विराजमान होऊन विष्णुलोकात गेला. जगात या व्रतापेक्षा उत्तम दुसरे कोणतेच व्रत नाही. फक्त याचे माहात्म्य श्रवण आणि पठण केल्याने जे पुण्य प्राप्त होते ते एक सहस्त्र गौ-दान केल्या प्रमाणे आहे.

!! कथा-सार !!

    प्राणिमात्राला सदैव साधू संतांच्या संगतीत राहायला हवे. संतांच्या संगतीत राहून फक्त सद्बुद्धी प्राप्त होते असे नाही तर जीवनाचा उद्धार सुध्दा होतो. पापींची संगत प्राणिमात्राला नर्कात जाण्यास बाध्य करते.

!! ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः !!

 

No comments

Please do not enter any spam link in the comment box.

Powered by Blogger.